अहमदनगर :महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. पण, हे तिन्हीही पक्ष महानगरपालिका आणि इतर निवडणुका स्वतंत्र लढताना दिसत आहेत. अहमदनगरमध्येही आता काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. याबाबतचे मोठे वक्तव्य काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नगरमध्ये बोलत होते.
जोमाने कामाला लागा, पुढचा आमदार-महापौर काँग्रेसचाच -
नगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. सलग दुसऱ्यांदा शिवसेनेवर मात करत संग्राम जगताप राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे एकूणच अस्तित्व नगण्य आहे. महापालिकेत काँग्रेसचे चार नगरसेवक असले तरी ते राष्ट्रवादीचे की विखेंचे असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी मोठी घोषणा केली. 'नगर शहर हे काँग्रेस विचारांचे शहर आहे. शहरातील कामगार, अल्पसंख्याक, व्यापारी आदी घटक हा पक्षासोबत राहिला आहे. पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा. पुढील आमदार आणि महापौर हा काँग्रेस पक्षाचा होऊ शकतो', असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीची चलबिचल -
मात्र, बाळासाहेब थोरतांच्या या भूमिकेने राष्ट्रवादीत नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादी काहीशी चलबिचल झाली आहे. काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष पदी किरण काळे यांची निवड झाली. तेव्हापासून काळे यांनी शहरात काँग्रेस संघटन वाढवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर थोरातांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, असे वक्तव्य केले; की भविष्यात आघाडीत काही राजकीय फेरबदल झाले तर पक्ष बांधणीची तयारी सुरू केलीय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाने थोरतांची नगर जिल्ह्यावर आता एकहाती पकड आहे. ही पकड घट्ट करण्यासाठी पक्ष वाढीवर त्यांनी भर दिल्याचेही बोलले जात आहे.