संगमनेर (अहमदनगर) - कोरोना नियमांचे पालन करा, असे सांगणाऱ्या पोलिसांवरच जमावाने हल्ला करत बॅरिकेट्स तोडून, तंबू उखडून पोलिसांसह खासगी वाहनांवरही तुफान दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात घडला आहे. रोजा सुटण्याच्या वेळी मोठी गर्दी उसळल्याने ती रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने हल्ला करण्याची संतापजनक घटना (गुरूवार) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास येथील तीनबत्ती चौकात घडली आहे.
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपवास सुटण्याच्या वेळी लखमीपूरा परिसरात मोठी गर्दी झाली होती. गस्तीवर असलेल्या अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी त्याठिकाणी पोहोचली. गर्दी करणाऱ्या बहुतेक कोणत्याही नागरिकांनी मास्कही घातलेला नव्हता आणि त्यांच्याकडून सामाजिक अंतराच्या नियमांचीही पायमल्ली सुरु होती. त्यामुळे गस्ती पथकातील राज्य राखीव दलाच्या जवानांंनी तेथे जमलेली गर्दी हटवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी अनेकांनी पोलिसांच्या अस्तित्वाकडेच दुर्लक्ष करुन मनमानी सुरु केल्याने जवानांनी जमावाला धाक म्हणून हातातील काठ्यांचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावातील काही असंवेदनशील तत्त्वांचा ‘अहमं’ दुखावला आणि त्यांनी जमलेल्या गर्दीला भरकटवून पोलिसांविरोधात भडकावण्यास सुरुवात केली. तो पर्यंत राखीव दलाचे जवान तेथून निघून तीनबत्तीकडे निघाले. दरम्यानच्या काळात संतप्त झालेल्या जमावातील काही लोक पुणे महामार्गावर आले. तेथील बॅरिकेड्स फेकून देत हा जमाव तीनबत्ती चौकाच्या दिशेने पुढे सरकू लागला.
शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण
रस्त्यात येईल तो सरकारी अडथळा फेकून देत हा जमाव चौकात पोहोचला. यावेळी राज्य राखीव पोलीस दलातील एका निधड्या छातीच्या जवानाने साठ ते सत्तर जणांचा जमाव एकट्याने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्यात दगडं भरलेल्या जमावातील काहींनी त्यालाच धक्काबुक्की करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या जवानाला आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पलायन करावे लागले. त्यानंतरही जमावाने परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात काही खाजगी वाहनांचे नुकसानही झाले आहे. या घटनेने सायंकाळच्या सुमारास संगमनेर शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.