अहमदनगर - 'मरण पाहून सरणही थकलं...' असेच काहीसा चित्र कोपरगाव येथील अमरधाममध्ये बुधवारी पहायला मिळाले. कोपरगावमध्ये एकाच दिवशी 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या 14 मृतदेहांवर कोपरगाव शहरातील अमरधामामध्ये अंत्यविधी पार पाडले. एका पाठोपाठ एक मृतदेह जळत असल्याचे विदारक चित्र समोर पाहून अनेकांचे मन सुन्न झाले. तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे.
शासन-प्रशासन हतबल -
कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत अनेक उपाय योजना करण्यात आल्या मात्र, अद्याप प्रभावी उपाय सापडलेला नाही. उलट पहिल्या लाटेपेक्षा सध्याच्या दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोपरगावमध्ये मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने अमरधाममध्ये अंत्यसंस्कारचे नियोजन देखील बिघडत चालले आहे. कोपरगावमध्ये 21 एप्रिल (बुधवारी) विदारक चित्र बघायला मिळाले. एकाच दिवशी 14 कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.