अहमदनगर- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे कोरोना संसर्गाचा फायदा घेऊन गैरपध्दतीने रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री केली जात आहे. या रॅकेटवर जिल्हा गुन्हे अन्वेषन शाखेने छापा टाकून एकूण चार आरोपींना अटक केले आहे. तर एक आरोपी मात्र फरार झालेला आहे. या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छुप्या पद्धतीने आणलेली ही विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शन प्रत्येकी 35 हजार रुपयांत आरोपी विक्री करत होते.
एक रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल पस्तीस हजाराला
याबाबत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, छुप्या पद्धतीने आणलेले सहा रेमडेसिवीर इंजेक्शन नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा या गावात एका हॉटेल समोर विक्री करणार असल्याची माहिती जिल्हा गुन्हे अन्वेषन शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषन शाखेच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून एकूण सहा इंजेक्शन, एक चारचाकी वाहन, मोटर सायकल व मोबाइल जप्त करून या रॅकेटमधील चार जणांना अटक केली आहे.
प्रत्येकी 35 हजार रुपयात इंजेक्शनची विक्री
छुप्या पद्धतीने आणलेली ही विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शन प्रत्येकी 35 हजार रुपयात आरोपी विक्री करत होते. रामहरी बाळासाहेब घोडेचोर (राहणार देवसडे तालुका नेवासे), आनंद पुंजाराम थोटे (राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव), पंकज गोरक्षनाथ खरड (राहणार देवटाकळी तालुका शेवगाव), सागर तुकाराम हांडे (राहणार खरवंडी तालुका नेवासा) या चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाळ्यातील एक आरोपी फरार झालेला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे अन्वेषन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
जिल्ह्यात चोरी-छुप्या मार्गाने होतेय रेमडेसिवीरची विक्री
कोरोनाचा कहर सुरूच असताना अनेक रुग्णांना रुग्णालयाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यास सांगण्यात येते. वास्तविक हे इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असावीत असा आदेश आहे. मात्र रुग्णालयाने रेमडेसिवीर आणण्यास सांगितल्यानंतर एजंट कडून इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात येते. हतबल नातेवाईक आपल्या रुग्णासाठी तीस ते चाळीस हजार रुपये प्रत्येकी एका इंजेक्शनला द्यायला तयार होतो. या पद्धतीने अनेकजण चोरी-छुप्या पद्धतीने लाखो रुपये कमवत असून जिल्ह्यात अनेक असे प्रकार उघडकीस आले असून गुन्हे दाखल झाले आहेत. यात मेडिकल स्टोअर चालक, वॉर्डबॉय, नर्सेस आदींचा समावेश आहे. नगर, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व आता नेवासे येथे गैरमार्गाने रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्याचे प्रकार पुढे आले आहेत.
हेही वाचा -पंतप्रधान व योगी आदित्यनाथांची सोशल मीडियावर बदनामी; पुण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल