अहमदनगर -गेल्या वर्षी कोरोनाविषाणूचा प्रभाव वाढलेला असताना मार्च महिन्यापासून साधारण तीन महिने लॉकडाऊन काळात सर्व देश ठप्प होत उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. याचा सर्वाधिक आर्थिक फटका बसत दोन वेळच्या जेवणाची तारांबळ उडाली ती हातावर पोट असणाऱ्या पथविक्रेते आणि फेरीवाले विक्रेत्यांची. हातात असलेले तुटपुंजे भांडवल उदरनिर्वाहासाठी वापरल्याने लॉकडाऊन उठल्यानंतर भांडवलच नसल्याने जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पीएम स्वनिधी योजना' ही या वर्गासाठी सुरू करत त्यांना दहा हजार रुपयांचे खेळते भांडवल हातात दिले आणि त्याचा लाभ घेत हजारो पथविक्रेते-फेरीवाल्यांचे व्यवसाय आणि पर्यायाने संसार पुन्हा उभे राहिले.
महापालिका, नगरपालिका-नगर पंचायत यांनी केले सर्वे
हॉकर्स अर्थात पथविक्रेते, फेरीवाले यात रस्त्यांवर विक्री करणारे चहा-वडापावच्या टपऱ्या, फळ-भाजीपाला विक्रेते, मोची, चप्पल-बूट विक्रेते, कटलरी सामान विक्रेते आदीं अल्प भांडवलावर आणि स्वतःची जागा नसणारे अल्पउत्पन्न गटातील व्यावसायिक यांचा सर्वे पंतप्रधान आत्मनिर्भर योजना अर्थात पीएम स्वनिधी योजनेसाठी केला गेला. हा सर्वे महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात महापालिकेसह पंधरा पालिका आणि पंचायतीमध्ये हा सर्वे करण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचे खेळते भांडवल या योजनेद्वारे देण्यात येते. यात अहमदनगर महानगरपालिकेला चार हजार तीनशे चाळीस (४, ३४०) ऑनलाइन अर्ज आले होते, पैकी पात्र दोन हजार पस्तीस (२, ०३५) अर्ज अग्रणी बँकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार विविध बँकांनी मंजूर केले असून आतापर्यंत एक हजार सहाशे सतरा (१, ६१७) अर्ज धारकांना विविध बँकांनी वितरित केले आहेत. या कर्जाची एक वर्षात परतफेड करायची असून नियमित हप्ते भरणाऱ्या लाभार्त्यांना सात टक्के व्याज परतावा मिळणार आहे, तसेच डिजिटल पेमेंट करणाऱ्या लाभार्त्यांना शंभर रुपये प्रतिमाहिना कॅशबॅक त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
नियमित हप्ते भरू पण वाढीव कर्ज मिळावे ही अपेक्षा