अहमदनगर- दिवसेंदिवस जामखेड शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णसंख्येची वाढती संख्या पाहून प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी जामखेड शहरात आजपासून (१० मे) दहा दिवसांचा(२० मे पर्यंत) जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शहरातील व्यापारी संघटनांशी चर्चा करून सहकार्य सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सभापती सुर्यकांत नाना मोरे, सावळेश्वर ग्रृप चे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे, शिवसेना तालुकाउपप्रमुख संजय काशीद, व्यापारी सुरेश भोसले, यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.
जामखेड शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. परंतु, जामखेडकरांकडून शासनाच्या सौजन्याचा गैरफायदा घेत रस्त्यावर गर्दी केली जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे संचारबंदीचा उद्देश सफल होत नाही. त्यामुळे जामखेड शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यू लावण्याचा एकमुखी निर्णय घेतला. मात्र कृषी सेवा केंद्र आणि किराणा दुकानांचा बाहेरगावाहून माल घेऊन येणाऱ्या मालवाहतूक वाहनांना यातून सवलत देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.