अहमदनगर - नशिबाने आपल्याला मुबलक दिले आहे. मात्र, त्याच्यावर फक्त माझाच अधिकार आहे का? असा प्रश्न एका शिक्षक दाम्पत्याला पडला. यानंतर त्यांनी 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तिथेची जाणावा' या संत तुकाराम महाराजांच्या अंभगाला अंगिकारत समाजातील शक्य तेवढ्या वंचित घटकाला मदत करायचे व्रत हाती घेतले. त्यांच्या या उपक्रमातून अनेक निराधार, वंचित आणि होतकरू सामाजिक घटक आता पुन्हा जीवनातील नवी उमेद घेत आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील या शिक्षक दाम्पत्याचे काम अनेकांसाठी दिपस्तंभासारखे आदर्शवत असेच म्हणावे लागेल.
जीवनातला खरा आनंद दुसऱ्याला मदत करण्यात -
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हे शिक्षक दाम्पत्य आहे. पोपटराव फुंदे आणि अनुराधा फुंदे असे या दाम्पत्याचे नाव आहे. आपल्या दुचाकीवर ते घराबाहेर पडतात आणि परिसरातील माहिती मिळालेल्या दुःखी-पीडित कुटुंबाच्या घरी जात मदतीचा हात पुढे करतात, हा त्यांचा नित्यक्रम आहे. फुंदे शिक्षक दाम्पत्य करंजी परिसरातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, कुठेतरी आपल्याला जे काही मिळते आहे यावर फक्त आपलाच अधिकार नाही. तर दुसऱ्याला अपेक्षित मदत करण्यात आनंद आहे, हा मूलमंत्र त्यांना उमगला. यानंतर आपल्या घासातला घास वंचितांसाठी राखीव ठेवत ते अनेकांना मदतीचा हात देत आहे.
दाम्पत्याची अपेक्षा -
समाजातील वंचितांना आधार देण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी एकटे फुंदे दाम्पत्य अपूर्ण आहे. म्हणून यासाठी अनेकांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत या दाम्पत्याने व्यक्त केले आहे.