शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थानने सुरू केलेल्या कोविड सेंटरला मुंबई येथील टाटा सन्सच्या वतीने 1 कोटी 37 लाखांचे सुरक्षा साहित्य देणगी स्वरूपात देण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली.
साईबाबांच्या रूग्णसेवेचा वसा वृद्धींगत करण्यासाठी साई संस्थानने कोरोना सारख्या महामारीच्या काळात गोरगरीब रूग्णांच्या आधारासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या मदतीने कोविड सेंटरची सुरूवात केली आहे़. या सेंटरसाठी पीपीई कीट व एन-95 मास्कची गरज होती. यामुळे मंदीरातील पुजारी उपेंद्र पाठक व साईबाबा रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी हे साहित्य मिळवण्यासाठी पुढाकार घेत मुंबईतील टाटा ग्रुपच्या हेल्थ केअर इनोव्हेशनचे प्रमुख गिरीश कृष्णमुर्ती या उच्चपदस्थ
अधिकाऱ्यांशी संपर्क केला.
शिर्डी साईबाबा संस्थानला टाटा सन्सकडून 1 कोटी 37 लाखांचे कोविड साहित्य दान - टाटा सन्स बातमी
साईबाबा संस्थानने सुरू केलेल्या कोविड सेंटरला मुंबई येथील टाटा सन्सने 1 कोटी 37 लाखांचे सुरक्षा साहित्य देणगी स्वरूपात दिले आहे.
साईभक्त असलेल्या कृष्णमुर्ती यांनी ही बाब टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रा यांच्या समोर मांडली होती. त्यानुसार टाटा सन्स प्रा. लिमिटेड यांनी तत्काळ साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरसाठी 5 हजार पीपीई कीट, 8 हजार एन-95 मास्क, फेस शिल्ड, आय प्रोटेक्शन गॉगल इत्यादी साहित्य पाठवले आहे. या साहित्याची किमंत जवळपास एक कोटी 37 लाख 43 हजार रूपये असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रितम वडगावे, साईबाबा रूग्णालयाचे खरेदी अधिकारी कुणाल आभाळे आदींची उपस्थीती होती.