शिर्डी- राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई दरबारी जाऊन साईंचे दर्शन घेतले. 'राज्यातील दुष्काळ हटून सर्व धरणे पाण्याने भरु देत', असे साकडे साई चरणी घातले असल्याचे यावेळी विखेंनी सांगितले.
विखे पाटलांनी यावेळी बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, नवीन अध्यक्षांनी पक्षातील लोक कसे पक्षात टिकून राहतील याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी थोरातांना दिला आहे. लोकसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालंय. आता विधामसभेत 230 जागांवर युतीचा विजय होईल अशी परिस्थिती असल्याचे विखेंनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत युतीमध्ये सुरु असणाऱ्या वादावरही विखेंनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील यात कोणताही संदेह नाही. मात्र युतीत बेबनाव वाढू नये म्हणून अन्य मंडळींनी यावर भाष्य करणे टाळावे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये होणारी संभ्रमावस्था टाळता येईल, असे विखे पाटील म्हणाले.