अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका गावी वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सोळा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या मुलीचे आई-वडील येथे वास्तव्यास आहेत. मोलमजुरी करून ते आपला चरितार्थ चालवितात. नेहमीप्रमाणे मुलीचे आई वडील सकाळी मोलमजुरीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीचा भाऊ क्लाससाठी निघून गेला. त्यानंतर या मुलीचा घातपात झाला असावा, अशी शक्यता आहे.
मुलीचा भाऊ घरी आल्यावर उघड झाली घटना
मुलीच्या मृतदेहाजवळ एक कापडी बोळा आढळून आल्याने सांगण्यात आले. दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. मुलीस खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.