सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया शिर्डीSupriya Sule took darshan of Sai Baba : उद्धव ठाकरे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्याचवेळी ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. त्यामुळं त्यांचा आदर केला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. कोणावरही भाष्य करताना प्रत्येकानं चौकटीत राहूनचं भाष्य करावं, असा सल्ला देखील सुळे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. शिर्डीत साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांसाठी खोके सरकार दिल्लीत का जात नाही : आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यातील पालकमंत्री नेमण्याची वेळ आली की, खोके सरकार तातडीनं दिल्लीला रवाना होतं. आता राज्यात अवकळी पावसानं मोठं थैमान घातलंय. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खोके सरकार काही दिल्लीत जात नाही. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एकदा तरी दिल्लीत जावं, असं सुळे यांनी म्हटलंय. तसंच राज्य सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारकडं केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा : राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार गटानं दावा केला आहे. त्यामुळं सध्या अजित पवार विरुद्ध शरद पवार असा न्यायालयान लढा सुरू आहे. याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशात कुठेही जा, कुणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे. देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा असल्याचं माहीत आहे. यात काही वेगळ सांगण्याची गरज नाही. पवारांसह तळागाळातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं केलंय, असंही सुळे म्हणाल्या. तसंच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं, अशी माझी मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय. संसदेच्या येत्या अधिवेशनात याबाबत विधेयक मांडण्याची विनंती आपण ओम बिर्ला यांना केल्याचंही सुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
सुप्रिया सुळे साई चरणी : आज सुप्रिया सुळे एका कार्यक्रमासाठी पुण्याहून हेलिकॉप्टरनं पारोळ्याला जात होत्या. मात्र अचानक खराब हवामानामुळं त्यांच्या हेलिकॉप्टरला काकडी विमानतळावर उतरावं लागलं. यानंतर सुप्रिया सुळे शिर्डीत आल्या. त्यानंतर त्यांनी साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. काही वेळ त्यांनी साई मंदिरात साईबाबांचं ध्यान केलं. त्यानंतर हवामानात सुधारणा झाल्यानंतर सुळे पुन्हा काकडी विमानतळाकडं रवाना झाल्या.
हेही वाचा -
- विरोधकांवर मुद्दाम गुन्हे दाखल, शेतकऱ्यांसाठी राज्यभर निषेध मोर्चे काढणार - जयंत पाटील
- "आम्हाला CAA लागू करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही", अमित शाह बंगालमध्ये गरजले
- जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, हिवाळी अधिवेशन दहा दिवसातच गुंडाळणार - वडेट्टीवार