अहमदनगर Indurikar Maharaj :निवृत्ती देशमुख महाराज उर्फ इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्ध गर्भधारणापूर्व कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात खटला सुरू आहे. इंदुरीकर महाराज आज पुन्हा न्यायालयात गैरहजर राहिले. या प्रकरणी पुढील सुणावनी 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र इंदुरीकर महाराज यांनी वकिलांमार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केलाय.
पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी :वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. समन्स बजावूनही इंदुरीकर महाराज आजच्या सुनावणीला गैरहजर होते. या प्रकरणाची सुनावणी संगमनेर कनिष्ठ न्यायालयात सुरू आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावतीनं वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला.
संततीबाबत वादग्रस्त विधान भोवलं : 2020 मध्ये इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात संततीबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. 2020 मध्ये दाखल झालेल्या खटल्यात जिल्हा न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसंच राज्य सरकारनं या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानं हे प्रकरण जिल्हा न्यायालयात पुन्हा चालविण्याचे आदेश दिले होते. तोच आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवत इंदुरीकर महाराजांविरुद्धचा संगमनेर न्यायालयात नव्याने खटला सुरू करण्यात आला आहे.
इंदुरीकर महाराजांना समन्स :या प्रकरणी न्यायालयानं गेल्या महिन्यात इंदुरीकर महाराजांना समन्स बजावलं होतं. मात्र, इंदुरीकर महाराज भेटत नसल्याचा अहवाल पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आला. या खटल्याची आज पुन्हा सुनावणी झाली, मात्र आज देखील इंदुरीकर महाराज सुनावणीला हजर झाले नाहीत. इंदुरीकर महाराजांच्या पुढील सहा महिन्यांच्या तारखा ‘बुक’ झाल्या आहेत. त्यामुळं इंदुरीकर महाराज न्यायालयात येऊ शकत नसल्याचं त्यांच्या वकिलांनी न्यायलयाला सांगितलं. सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकील खटला लढवत असताना तक्रारदार हस्तक्षेप करू शकत नाहीत, असा युक्तिवादही इंदुरीकर महाराज यांच्या वकिलांनी केला.
महाराजांविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी :त्यावर तक्रारदार रंजना गरांदे यांनी न्यायालयासमोर आक्षेप अर्ज सादर केला. कोर्टानं इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावलं आहे. मात्र, ते कुठं आहे याबाबत काहीच माहिती नाही, पोलिसांनी देखील तसा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळं महाराजांविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी गरांदे यांनी न्यायालयात केलीय. इंदुरीकर महाराजांच्या पुढील सहा महिन्यांच्या तारखा बुक करण्याच्या मुद्द्यावर गरांदेम्हणाल्या की, कायद्यापुढं सर्व समान आहेत. न्यायालय 21 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी करणार आहे, अंस देखील गरांदे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- नाशिक : इंदुरीकर महाराज डॉक्टरांच्या वर नाही; त्यांनी फक्त धर्म प्रचारकाचे काम करावे - महंत अनिकेत देशपांडे
- इंदोरीकर महाराजांना लसीचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्व पटवून देईल - आरोग्यमंत्री
- 'मी लस घेतली नाही, घेणारही नाही" इंदोरीकर महाराजांच्या विधानावरून वादंग