अहमदनगर- रोहित पवार यांचा कर्जत जामखेड मतदारसंघातुन उमेदवारीचा निर्णय ज्येष्ठ मंडळी करतील त्याबाबत मी बोलू इच्छित नाही, असे स्पष्टीकरण सुनंदा पवार यांनी दिले आहे.
मला राजकारणात रस नसून मी शेती, शिक्षण आणि पाणी यावरच काम करणे पसंत करते. आम्ही पुणे, बीड, सातारा, लातूर आणि नगर आदी जिल्ह्यात शेती-पाणी-दुष्काळ यावर काम करत आहोत. रोहित यासर्व ठिकाणी जातीने लक्ष देतात, तेंव्हा ते सगळीकडेच निवडणूक लढवणार का, असा प्रतिप्रश्न करत सुनंदा पवार यांनी राजकारण विरहित पवार कुटुंब अनेक ठिकाणी काम करत असल्याचे सांगितले. यावेळी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, साकत सरपंच हनुमंत पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
कर्जत-जामखेड येथे पवार कुटुंबाकडून चालू असलेली कामे
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचे विशेष लक्ष
जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम सध्या बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुरू आहे. या कामाचा शुभारंभ रोहित पवार यांच्या मातोश्री आणि शारदा प्रतिष्ठान आणि अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रोहित पवार यांनी वर्षभरापासून कर्जत-जामखेड मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. गावपातळीवर विविध कार्यक्रम आणि उपक्रमातून त्यांनी जनसंपर्क ठेवलेला आहे. सध्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत जामखेड-कर्जत तालुक्यात १०० पेक्षा जास्त टँकरमधून पाणी पुरवण्याचे काम बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुरू आहे.
शरद पवारांकडे रोहितच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचे साकडे
दोन दिवसांपूर्वीच बीडला जाताना वाटेत कर्जत-जामखेड या दोन्ही ठिकाणी शरद पवार काहीवेळ थांबले होते. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी रोहित दादांना उमेदवारी द्या, असे साकडे शरद पवारांना घातले होते. विशेष म्हणजे यावेळी रोहित पवार सोबतच होते. यावेळी सकारात्मक स्मित करत पवार यांनी रोहित यांना, 'तुला चांगली मागणी आहे' असे वक्तव्य केले होते. आता सुनंदा पवार यांनीही जामखेड येथे तलावातील गाळ काढण्याच्या कामाच्या पहाणीच्या निमित्ताने भेट दिल्याने त्यांना रोहित पवार यांच्या संभाव्य उमेदवारी वरून छेडले असता, त्यांनी हा निर्णय पक्षातील ज्येष्ठ घेतील, अशी प्रतिक्रिया दिली.