अहमदनगर- काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शनिवारी सायंकाळी सदिच्छा भेट घेतली. विखे घराण्याचा राजकिय व सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याबाबात डॉ. सुजय यांच्यासारख्या तरुणांकडून आपणाला चांगल्या अपेक्षा आहेत, असे अण्णा हजारे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
दीर्घ उपोषणाने हजारे यांच्या बिघडलेल्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांना भेटलो, असे डॉ. विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.सुजय विखे पाटील यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, समाज आणि देशहिताचा विचार करून पद्मश्री विठ्ठलराव विखे व बाळासाहेब विखे पाटील यांनी जे राजकारण व समाजकारण केले ते महत्वाचे वाटते. राजकारण हे फक्त समाज, राज्य, राष्ट्रहितासाठीच असते आणि समाजकारण हेही त्यासाठीच असते. त्यात वेगळे काही नसते. फक्त ते अंमलात कसे येईल हे पहिले पाहिजे.
सुजय विखे तरुण मुलगा आहे. त्याला सामाजिक कार्याची परंपरा आहे. पणजोबा, आजोबा यांचा वारसा व त्यांची परंपरा आहे. ती परंपरा ते पुढे चालवतील. कारण हे सर्व त्यांच्या घरात चालत आलेले आहे. म्हणून तर आम्ही अपेक्षा करतो. ती परंपरा समाज, राज्य, राष्ट्रहिताकरिता या तरुणाने चालवावी. फक्त पद भूषविणे एवढाच राजकारणाचा हेतू नाही. तर समाज, राज्य आणि राष्ट्रहिताचा विचार करत असताना आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेण्याचा विचार झाला पाहिजे. आचार शुध्द, विचार शुध्द, जीवन निष्कलंक , जीवनात त्याग असला पाहिजे, अपमान पचविण्याची ताकद असली पाहिजे. ते निश्चितपणे काही तरी करू शकतील असे मला वाटते. आज ते भेटायला आले एक उमेदवार म्हणून असले तरी ते तरून आहे मला त्यांच्याकडून काही अशा वाटते.