अहमदनगर- नेवासा तालुक्यात येत्या ८ मे रोजी एक विवाह संपन्न होणार आहे. श्रद्धा येळवंडे आणि राहुल धोटेकर यांच्या विवाहाच्या पत्रिकेत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव प्रमुख उपस्थितांच्या यादीत छापण्यात आले आहे. सुजय विखे यांच्या नावापुढे मात्र ‘संसद सदस्य भारत सरकार’असे नमूद करण्यात आले आहे. ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
चक्क निवडणुकीच्या निकालाआधीच डॉ. सुजय विखे झाले खासदार - डॉ. सुजय विखे
सुजय विखेंच्या नावापुढे ‘संसद सदस्य भारत सरकार’असे नमूद केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. येत्या २३ मे रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, आताच सुजय विखेंना खासदार केले आहे.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील छबुराव येळवंडे यांची कन्या श्रध्दा आणि नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोळगाव येथील सुधाकर बाजीराव धोटेकर यांचे चिरंजीव राहुल यांचा येत्या ८ मे ला विवाह सोहळा आहे. वधूच्या वडिलांनी लग्नपत्रिकेत अनेक मान्यवरांचे नाव लिहले आहेत. त्यामध्ये सुजय विखेंच्या नावापुढे ‘संसद सदस्य भारत सरकार’असे नमूद केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. येत्या २३ मे रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, वधूच्या वडिलांनी आताच सुजय विखेंना खासदार केले आहे.
सुजय विखे पाटील भाजपकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना मैदानात उतरवून सुजय यांना आव्हान दिले होते. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या नजरा या मतदारसंघातील निकालाकडे लागल्या आहेत. त्यात आता विखे पाटील समर्थकांनी मात्र आधीच आपल्या पद्धतीने निवडणुकीचा निकाल लावून टाकला आहे. चक्क निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच डॉ. सुजय विखे पाटील यांच्या गुडघ्याला खासदारकीचे बाशिंग बांधले असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगल्या आहेत.