अहमदगर -संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेल्या जाचकवाडी येथील कारभारी कमळू महाले व त्यांचा मुलगा योगेश यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर चार एकर शेतात अंजीराच्या बागा फुलवल्या आहेत. त्यामुळे सध्या एका किलो या अंजीराला शंभर रूपयांचा भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दोन हजार अंजीरांची झाडे-
संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर जाचकवाडी हे गाव वसलेले आहे. महाले यांना सुरूवातीपासूनच शेतीची आवड आहे. त्यामुळे पंधरा ते विस वर्षापूर्वी त्यांनी आपल्या शेतात द्राक्षे, डाळींब, या फळबागा केल्या होत्या. मात्र त्यात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर त्यांनी अंजीर लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रथम दोन हजार सालामध्ये तीस गुंठे शेतीत दिडशे अंजीरांच्या झाडांची लागवड केली होती. पुढे अंजीरामध्ये चांगले पैसे मिळू लागल्याने आज जवळपास महाले यांच्या चार एकर शेतात दोन हजार अंजीरांची झाडे आहेत. सध्या अंजरीच्या बागा सुरू झाल्या असून पुणे जिल्ह्यातील ओतूर, बेल्हे, आळेफाटा, कोतुळ आदि ठिकाणच्या बाजारांमध्ये महाले स्वत्ता अंजीर विकण्यासाठी घेवून जात आहे.