अहमदनगर- कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वात जास्त मार हातावर पोट असलेल्यांना बसलेला असताना राज्य सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी ही अनेकांसाठी वरदान ठरली आहे. सरकारने केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली. मात्र नगरमध्ये काही शिवभोजन चालकांनी ही योजना पदरात पाडून, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी चक्क बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे पुढे आले आहे.
नगर शहरात बळीराजा भोजनालय आणि रेव्हेन्यू कँटीन या दोन संस्थांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे चक्क बनावट कागदपत्रे सादर करून शिवभोजनालय सुरू केली होती. ही बाब लक्षात येण्यास अन्न आणि औषध प्रशासनाला सुद्धा उशीर झाला आहे. कोरोनात गरिबांना जेवण मिळावे, यासाठी वाढीव थाळीचा प्रस्ताव आल्यानंतर ही बाब विभागाच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी या दोन्ही संस्थांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही संस्थांनी सुरुवातीला दाखल केलेले प्रस्तावात त्रुटी होत्या, त्या दुरुस्त करण्यास सांगण्यात आल्या. नंतर रितसर कागदपत्रांची परवानगी आणि पूर्तता न करता बनावट कागदपत्रे तयार करून अन्न आणि औषध विभागाला ती सादर करण्यात आली.
मात्र अन्न आणि औषध विभागाच्या उपयुक्तांना ही बनवाबनवी लक्षात आली. तेव्हा त्यांनी या शिवभोजन चालक संस्थांविरोधात कडक भूमिका घेत कारवाई केली. याबाबत आता शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्या भागात ही शिवभोजन केंद्र सुरू होती तो भाग मोल-मजूरी करणाऱ्या कामगारांचा भाग आहे, त्यामुळे या केंद्रावर रोज मोठी गर्दी होती. लॉकडाऊनच्या काळात तर कामगारवर्गावर उपासमारीची वेळ आली असल्याने सरकारने केवळ पाच रुपयांत जेवण सुरू केले. त्यामुळे या केंद्रावर गरजूंची मोठी उडी पडत होती.