अहमदनगर- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात राज्यात सर्वत्र शाळा-विद्यालये बंद आहेत. असे असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजाराने धाडसी निर्णय घेत पंधरा जूनला शाळा सुरू आहे. ही शाळा सुरू होऊन 25 सप्टेंबरला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. शाळा संपूर्ण शंभर दिवस अविरत सुरू राहिल्याने गावामध्ये विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गावपातळीवरील घेतलेल्या आरोग्य सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजनेमुळे हिवरे गावात एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. याबाबत बोलताना हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार म्हणाले, की ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा आहेत. हे पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑफलाइन शिक्षण हाच पर्याय आहे. मात्र, त्यासाठी कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. आम्ही ते पाळल्याने शंभर दिवसांनंतरही शाळा सुरक्षितपणे अविरत सुरू आहे.
हेही वाचा-मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 1500 कोटींच्या घोटाळ्याचा किरीट सोमैयांचा आरोप
पंचसुत्री राबवून काही दिवसांत हिवरेबाजार 100 टक्के कोरोनामुक्त-
जूनपूर्वी हिवरेबाजारमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले होते. मात्र, पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, गावातील आरोग्य यंत्रणा, फ्रंटवर्कर टीम यांनी कोरोनामुक्तीची पंचसूत्री राबविली. अवघ्या काही दिवसांत हिवरेबाजार 100 टक्के कोरोनामुक्त झाले.