अहमदनगर :महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डी.सी.पी.एस. धारक कर्मचारी 14 मार्च पासून संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागु व्हावी या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन त्यांनी सुरु केले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात अधिकारी, कर्मचाऱ्यांची 4 हजार 520 पदे मंजूर असून त्यातील 2 हजार 349 पदे भरलेली आहेत. त्यापैकी 1 हजार 450 कर्मचारी हे डी.सी.पी.एस. धारक आहेत. त्यापैकी विद्यापीठातील 50 टक्के कर्मचारी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे.
विद्यापीठाचे कामकाज ठप्प : या कामबंद आंदोलनाचा विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन, विस्तार, प्रशासन तसेच विकास कामावर परिणाम झाला आहे. या आंदोलनामध्ये कृषि सहाय्यक संघटना, लिपीक वर्गीय संघटना, मागासवर्गीय सेवक संघटना, प्राध्यापक संघटना असे सर्व मिळून कर्मचारी मध्यवर्ती समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली संप करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा म्हणून जुने पेन्शनधारक अधिकारी, कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देवून विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला आहे.