अहमदनगर - मार्चपासून बंद झालेल्या राज्य परिवहन सेवेमुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लवकरात लवकर एसटी महामंडळाने दैनंदिन फेऱ्या सुरू करण्याची मागणी शेवगाव एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी निवेदन देखील दिले होते. अखेर काल सकाळी शेवगाव बस आगारामध्ये 'डफली बजाव' आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी किसन चव्हाण यांनी संबंधित आंदोलन पुकारले.
शेवगाव एसटी आगारामध्ये 'डफली बजाओ' आंदोलन
मार्चपासून बंद झालेल्या राज्य परिवहन सेवेमुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लवकरात लवकर एसटी महामंडळाने दैनंदिन फेऱ्या सुरू करण्याची मागणी शेवगाव एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेवगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शेवगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी किसन चव्हाण, प्रकाश बापू भोसले, शेख प्यारेलाल, ॲड शामभाऊ कणगरे, राहुल भारस्कर आणि अन्य पदाधिकारी तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी एसटी महामंडळाचे शेवगाव आगारप्रमुख देवराज यांनी एसटीच्या फेऱ्या हळूहळू सुरू करत असल्याचे सांगितले. तसेच आंदोलन मागे घ्यावे, असे लेखी आश्वासन घेतले आहे.