अहमदनगर : आपण सगळेचजण दुचाकी वापरतो. दुचाकीला असलेले इंडिकेटर दुचाकी डावीकडे किंवा उजवीकडे वळवताना वापरले जाते. मात्र याच इंडिकेटर मध्ये पार्किंग, ब्रेक आणि वळण्याचे इंडीकेशन एकत्र का असू नये?, असा विचार करत अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने 'थ्री इन वन' इंडिकेटर बनवले आहे.
मोटरसायकलमधील इंडिकेटरकेवळ वळतानाच उपयोगी : चारचाकी गाडीला मोठा टेललँप असतो. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना तो स्पष्ट दिसतो. त्यामध्ये ब्रेक लाईट, पार्कींग लाईट आणि वळण्याचे इंडिकेटर अशी तिहेरी सुविधा असते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना रात्रीच्या वेळी सिग्नल मिळतो. मात्र मोटरसायकलचा टेललँप आकाराने लहान असतो. त्यातच रात्री मोटरसायकल पंक्चर झाली अथवा बंद पडली तर ती बंद अवस्थेत लोटत नेताना अनेक अडचणी येतात. रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांना तिचा अंदाज येत नाही. कारण मोटरसायलमध्ये असलेले इंडिकेटर केवळ वळतानाच काम करते.
इंडिकेटरबनवण्यासाठी टाकाऊवस्तूंचा वापर : रात्री मोठ्या गाड्यांना समोरून येणाऱ्या मोटरसायकलच्या अंतराचा अंदाज यावा आणि मोटरसायलमध्ये अतिरिक्त लाईट व्यवस्था असावी, हा विचार करून अकोले तालुक्यातील विरगाव या छोट्याशा गावातील गणेश आरणे या तरुणाने एक विशिष्ट इंडिकेटर बनवले आहे. या इंडिकेटरमध्ये ब्रेक, पार्कीग आणि वळवण्याची दिशा दाखवणारी एलईडी लाईट व्यवस्था बसवली आहे. विशेष म्हणजे, हे इंडिकेटर बनवण्यासाठी या तरुणाने टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.
केवळ 70 रुपये खर्च! :गणेशने छोट्या गावात शिक्षण घेतले आहे. रोज दुचाकीवरून प्रवास करताना त्याला या 'थ्री इन वन' लाईटची संकल्पना सुचली. महाग चारचाकींना डे लाईट असतात, तर मग मोटरसायकलला सुरक्षित करण्यासाठी बहूउपयोगी लाईट का नसावे? असा विचार करून त्याने केवळ 70 रुपयात हा लाईट बनवला आहे. त्याने आपल्या संशोधनाच्या पेटंटसाठीही अर्ज केला आहे. महाराष्ट्रच्या ग्रामीण भागात असे अनेक संशोधक दडलेले आहेत. त्यांच्यातील कौशल्य ओळखत त्यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. त्यांना समाजाकडून पाठबळ मिळाल्यास ते भविष्यात यशस्वी संशोधक म्हणून ओळखले जाऊ शकतात.
हेही वाचा :
- Tree Man Special Story: चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम सोडून 'त्याने' घेतला वृक्ष लागवडीचा ध्यास, जाणून घेवू या अवलियाबद्दल