अहमदनगर- जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी या गावाला जाण्यासाठी होडीचा एकमेव पर्याय आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी येथील ग्रामस्थांना रोज होडीतून प्रवास करावा लागतो.
आपण एकीकडे बुलेट ट्रेन,डिजीटल इंडियाच्या गप्पा करत असताना दुसरीकडे एका गावाला आजही होडीतून प्रवास करावा लागतो. राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी या गावातील लोक आजही जीव धोक्यात घालून प्रवास करतात. सत्तरच्या दशकात मुळा धरणाची निर्मिती करण्यात आली. राहुरी तालुक्यात या धरणाच्या पाण्याचा फुगवटा मोठा आहे. त्यामुळे राहुरीपासून अवघे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेली पुर्नवसीत गावे विभागली गेली आहेत.
वावरथ जांभळी गावची लोकसंख्या पाच हजाराच्या वर आहे. गाव म्हणजे एक बेटच म्हणावे लागेल.या गावचे तहसील कार्यालय राहुरी येथे आहे. चारचाकी वाहनाने पोहचायचे म्हटले की, जिल्ह्याच्या मुख्यालयात जाऊन नव्वद किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे रोजच्या छोट्या-मोठ्या कामासाठी बोटीने प्रवास करावा लागत आहे.
स्वातंत्र्य काळापासून गावातील नागरिकांना जीव मुठीत धरून मुळा धरणाच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तीही होडीच्या माध्यमातून सन 2010 ला या गावाला होडी देण्यात आली होती. मात्र, ती आता खराब झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गावातील ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार, शाळा, काॅलेज, दवाखाने, खरेदी-विक्री, व्यापार, रोजगार हे सर्वच राहुरी शहरातूनच चालतो. त्यामुळे ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी मुळा धरणाच्या 1 किमी पाण्यातून होडीतून रोजचा प्रवास करावा लागतो. या गावाकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना अच्छे दिनवाल्या सरकारचे.
2002 साली तत्कालिन होडी पाण्यात बुडाल्यानंतर 55 जण पाण्यात गेले होते. त्यावेळी 3 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला होता. दरम्यान, सदरच्या घटनेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष गेल्यानंतर तत्कालीन पालकमंत्र्यांनी यांत्रिक बोट दिली होती. मात्र, हा कायमचा उपाय नसल्याने येथे पूल बांधण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबितच आहे. 25 लाख रुपयांची नवीन होडी जांभळी ग्रामस्थांना मिळाली होती. मात्र, त्या वेळी ती पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने बंद पडत चाललेल्या इंजिनाचे मॉडल या होडीला वापर होते. आता ग्रामस्थांनी खराब झालेल्या गेअर बॉक्सच्या दुरुस्तीसाठी थेट मुंबई गाठली होती. मात्र, तरीही दुरुस्ती होत नाही. गेल्या अनेक निवडणुकांत या गावाला पूल बांधून देऊ, असे सांगत मते मागितली गेली. मात्र, अद्यापही प्रश्न सुटलेला नाही तातडीच्या निधीतून इंजिन खरेदी करुन या मरण यातनेतून सध्या सुटका करावी आणि पुलाचे काम सुरु करावे अशी मागणी होत आहे.