अहमदनगर -शहराला लागून वाहणाऱ्या सीना नदी पात्रात लहान बाळाला एका पोत्यात बांधून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती एका महिलेने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी आणि अहमदनगर मनपाच्या आपत्कालीन यंत्रणेने तातडीने सीना नदी पात्रात शोध कार्य सुरू केले.
जेव्हा अज्ञातांनी पुलावरुन हे पोते नदीपात्रात फेकले त्यावेळी पोत्यातून रडण्याचा आणि पोत्यात हालचाल होत असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. तर नेमके पोत्यात काय होते याबाबत ठोस उलगडा झाला नाही. तरी महिलेने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी घटनास्थळावरील नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. या ठिकाणी तोफखाना आणि कोतवाली अशा दोन पोलीस ठाण्याची हद्द येते, त्यामुळे या दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच मनपाच्या आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी, अग्निशमन दल यांनी शोधकार्य सुरू केले.