शेवगाव (अहमदनगर) -अवैध वृक्षतोडीबाबत वनविभागाविरोधात सामाजिक कार्यकर्ते भगवान मिसाळ यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. ते आजपासून शेवगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहेत.
अहमदनगर : वन विभागाविरोधात शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण - वृक्षतोडीविरोधात उपोषण बातमी
अवैध वृक्षतोडीविरोधात भगवान मिसाळ हे आपल्या काही साथीदारांसह शेवगाव येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
तालुक्यातून अवैध पद्धतीने वृक्षतोड करुन आसापासच्या जिल्ह्यात नेले जात आहेत. याला वनविभाग अप्रत्यक्षपणे डोळेझाक करत असून अवैध वृक्षतोडीवर कोणाचेच अंकुश राहिलेले नाही, असा आरोप त्यांनीकेला आहे. तसेच माहितीच्या आधाराखाली वनविभागाने अवैध वृक्षतोडीबाबत कोणतीच माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाकडून अवैध वृक्षतोडीबाबत कोणतेही ठोस पावले उचलले जात नाहीत तोपर्यंत बेमुदत उपाषण सुरू राहणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. हे उपोषण कोरोनाबाबातच्या सर्व नियामांचे पालन करत सुरू असल्याचेही ते म्हणाले.
उपोषणाच्या ठिकाणी शेवगावचे गुप्त वार्ता विभागाचे राजू चव्हाण, पाथर्डी वनक्षेत्र विभागाचे शिरीष निरभवणे, तसेच शेवगाव वनाधिकारी पांडुरंग वेताळ यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसह चर्चा केली. पण, अद्यापपर्यंत कोणताही मार्ग निघाला नसल्याने हे उपोषण सुरुच आहे.