राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना अहमदनगर: समाज माध्यमांमधून माझ्या संदर्भात पसरविले जाणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. याप्रकारच्या वावड्या पसरविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. माझी बदनामी करण्याच्या हेतू आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. राज्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व मिळाले आहे. राज्याचा निर्णय हा पंतप्रधानांच्या स्तरावर झाला असल्याने यामध्ये कुठलीही विसंगती असण्याचे कारण नाही, असे स्पष्ट मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत व्यक्त केले आहे.
नैसर्गिक आपत्तीकडे दुर्लक्ष नाही:आम्ही अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाला गेलो असलो तरी, राज्यातील नैसर्गिक आपत्तीकडे कोणतेही दुर्लक्ष आमचे झालेले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वचजन आज पाहाणी दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. या नैसर्गिक संकटात टिका टिपण्णी करण्यापेक्षा सरकारला तुम्ही सुचना कराव्यात असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी विरोधकांना केले आहे.
नुकसानीचे पंचनामे करा:अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. शेतातील उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुध्दा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येणार आहेत. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना महसूल आणि कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आढावा बैठकही संपन्न: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत साईबाबा संस्थानच्या सभागृहात आढावा बैठकही संपन्न झाली. यामध्ये राहाता, कोपरगाव, संगमनेर या तीनही तालुक्यांचे महसूल आणि कृषी विभागांचे वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते. तालुकानिहाय झालेल्या नुकसानीची आकडेवारी त्यांनी जाणून घेतली. वादळी वाऱ्याने विजेच्या ताराही अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्याची जोडणी तातडीने करुन, वीजप्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा अहवाल समन्वयाने तयार करावा, असे सुचविण्यात आले. यासह मागील नैसर्गिक आपत्तीमधील किती शेतकरी मदतीपासून वंचित आहेत याची माहितीही त्यांनी या बैठकीत जाणून घेतली गेली.
हेही वाचा:Gangster Prasad Pujari : प्रसाद पुजारीच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला आला वेग; चीनहून मुंबईत आणणार