अहमदनगर - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहा पोलिसांना लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस घेतलेली आहे.
लसीची परिणामकारकता काही दिवसानंतर -
बेलवंडी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली आहे. एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांना त्रास जाणवू लागला त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली गेली. त्या सर्वांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित पोलिसांमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी आहे. या सर्वांची तब्येत ठीक असून त्यांना विलगिकरणात ठेवले आहे. त्यांना लस दिली असली तरी त्याचा परिणाम सुरू होण्यास पंधरा ते वीस दिवसांचा अवधी लागतो. मात्र, हे कर्मचारी लस दिल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बाधित झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.