शिर्डी- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे रहिवासी राजेश खटोड आणि हनुमंत खटोड यांच्या घराच्या परिसरात खोदकाम करत असताना मजुरांना गुप्तधन सापडले होते. खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी खटोड यांनी त्या मजुरास अकरा लाख रुपये देण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, ते पैसे देण्यास नकार दिल्याने आणि मानिसक छळ केल्याने त्याने आत्महत्या केली आहे, असा आरोप मृत मजुराच्या पत्नीने केला आहे. सुनिल गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी गायकवाड याच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बेलापुरातील दोन खटोड बंधुवर गुन्हा दाखल केला आहे.
बेलापूर येथे वट पौर्णिमेच्या दिवशी सुनिल गायकवाड हे दोन मजुरांना सोबत घेऊन राजेश आणि हनुमंत खटोड यांच्या घराचे मागील बाजुच्या मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी मजुरीने खड्डे खोदण्याच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी सुनिल गायकवाड यांना खोदकामात एक तांब्याचा हंडा सापडला. त्यामध्ये वर चांदी व खाली सोन्याची नाणी होती. तो हंडा पुर्णपणे भरलेला होता. खड्डा खोदताना हंड्याला धक्का लागला त्यामुळे त्यातील नाणी खाली पडली. त्यावेळी सुनिल यांनी ती नाणी फावड्याच्या सहाय्याने पुन्हा हंड्यात टाकली आणि राजेश व हनुमंत खटोड यांना याची माहिती दिली.
खटोड बंधुनी तो हंडा ताब्यात घेत याची वाच्यता न करण्यासाठी मजूर गायकवाड याला अकरा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी 1 लाख 28 हजार रुपये रोख त्यांनी सुनिलला दिले. मात्र त्यानंतर सुनीलने राहिलेले दहा लाख रुपये मागण्यासाठी वेळोवेळी राजेश व हनुमंत खटोड यांचेकडे हेलपाटे मारले. मात्र खटोड बंधूनी त्याल पैसे न देता शिवीगाळ करत मारहाण केली. तसचे आमच्याकडे भरपूर पैसे आहेत तुला कोठेही कामधंदा करु देणार नाही. तुला काम मिळू देणार नाही. तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणून भिक मागायला लावू, असे म्हणून गायकवाडला धमकावले.