अहमदनगर -कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील मंदिर, संस्थाने बंद करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीचे प्रसिद्ध साई मंदिर संस्थानदेखील आजपासून(सोमवार) भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाने घेतला आहे. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबाबत माहीती दिली असून पुढील निर्णय येईपर्यंत मंदीर भाविकांसाठी बंद राहणार आहे.
कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यातील रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आजपासून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, साई संस्थानच्या इतिहासातील मंदीर बंद ठेवण्याची ही पहीलीच वेळ आहे. मंदिराबरोबरच साई संस्थानचे प्रासादालय आणि भक्त निवासही बंद ठेवण्यात येणार आहेत. याच बरोबरीने शिर्डीतील खाजगी हॉटेल्सही बंद ठेवण्यात येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.