अहमदनगर - एका जिल्हा परिषेद शाळेतील आठ वर्षांची मुलगी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. श्रेया सजन असे या मुलीचे नाव असून ती तिसरी इयत्तेमध्ये शिकते. तिच्या हस्ताक्षरामुळे देश-विदेशात तिचे कौतुक होत आहे.
श्रेया सजन ही आठ वर्षांची मुलगी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे श्रेया सजन राहुरीमधील कडूवस्ती जिल्हा प्राथमिक शाळेत शिकते. श्रेयाने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक मिळाला. त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी ते फेसबुकवर पोस्ट केले. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. तिच्या वडीलांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओची दखल राज्यातील मंत्र्यांनी देखील घेतली.
हेही वाचा - जगासमोर आदर्श ठेवणारी जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा'
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तिचे हस्ताक्षर असलेले पान ट्विटरवर पोस्ट केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी 'श्रेयाला तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा! तुझाच जयंत काका' असे एक पत्रही तिला लिहले. उच्च तंत्रशिक्षण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू, खासदार सुप्रीया सुळे, खासदार सुजय विखे यांनीही श्रेयाचे कौतुक केले आहे.
श्रेयाचे वडील गोरक्षनाथ सजन हे श्रेयाच्या शाळेत शिक्षक आहेत. श्रेयाचे हस्ताक्षर सुंदर असल्याने पहिलीच्या वर्गापासून त्यांनी तिच्या हस्ताक्षराकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. त्यांनी युट्यूबवर कॅलीग्राफीचे व्हिडीओ पाहून तिला मार्गदर्शन केले. तिने मिळवलेले यश पाहून खूप आनंद होत असल्याची भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.