शिर्डी(अहमदनगर)- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्या आले. लॉकडाऊनमुळे बिहार राज्यातील कामगार जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकून पडले होते. राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील 1 हजार 104 कामगार व त्यांचे कुटुंबिय शुक्रवारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.यामध्ये राहाता व पिंप्री निर्मळ येथे शिक्षण घेणाऱ्या 86 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
राज्य शासनाने कामगारांचा स्वगृही परतण्याचा खर्च केला आहे. रेल्वे विभागाला एकूण 7 लाख 72 हजार 920 एवढी रक्कम कामगारांच्या तिकीटासाठी देण्यात आली आहे. रोजगारानिमित्त हे सर्व जण जिल्ह्यातील विविध तालुक्यांत वास्तव्यास होते. साईनगर शिर्डी येथून शुक्रवारी पहाटे ही रेल्वे मार्गस्थ झाली. प्रशासनातर्फे सोडण्यात आलेली ही पाचवी श्रमिक रेल्वे असून बिहारकडे जाणारी पहिलीच रेल्वे होती.