अहमदनगर -नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफानी हल्लाबोल केला. ज्यांना स्वतः ला घर नाही त्यांनी दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहू नये, अशी मार्मिक टीका शरद पवार यांनी मोदींवर केली.
शरद पवार म्हणाले की, आम्ही भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलो तरी आमचे कुटुंब आजही एक आहे. सणासुदीला आम्ही एकत्र येत असतो. मात्र, मोदी म्हणतात माझा पुतण्या सर्व राजकारण हातात घेऊ पाहतो आहे. बरं झालं मोदींना माझ्या पुतण्याचे कर्तृत्व कळाले. पण वस्तुस्थिती अशी आहे माझ्या आईवर शाहू-फुले-आंबेडकरांचा प्रभाव होता. त्यामुळे तिने आम्हा भावंडात एकोपा शिकवला जो आजतागायत सुरू आहे. पण ज्यांना घरच नाही त्यांना ही गोष्ट कशी समजणार असा सवाल पवार यांनी मोदींना उपस्थित केला.
मी इकडे का? याचे पवारांनी दिले उत्तर
पंतप्रधान मोदी सध्या भाषणातून माझे एकीकडे कौतुक करताना, लेकिन पवार साहब आप उधर कैसे? असा सवाल उपस्थित करत आहेत. यावर शरद पवार यांनी मोदींना प्रतिउत्तर देताना आपण मुळातच नेहरू-गांधी विचाराचे असल्याचे सांगितले. आपण इयत्ता नववीत प्रवरा नगर येथे शिकत असताना पहिले आंदोलन नगर जिल्ह्यात केल्याच्या आठवणीला उजाळा दिला. तेव्हा पासून आजतागायत आपण गांधी-नेहरू विचारात वाढलो आणि अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्याचे सांगितले. काही तात्विक मुद्यावर मतभेद असले तरी आपण गांधी-नेहरूंचा विचार कधी सोडला नाही, त्यामुळे मोदीजी मी इकडे आहे असे पवार म्हणाले.
एकदा इस्त्रायला शेतीविषयक कॉन्फरन्सला देशातील काही मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन गेलो होतो, त्यात मोदी पण होते. त्यावेळी मी त्यांना जिज्ञासा म्हणून मी शेतीतील काही गोष्टी सांगितल्या. आता त्याचाच आधार घेत मोदी हे मैं उनकी उंगली पकडकर बहुत कुछ सिखा, असे सांगत असल्याचा खुलासा पवार यांनी यावेळी केला.