शिर्डी (अहमदनगर) -आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत गुन्हेगारीराज हळूहळू डोके वर काढू लागले आहे. गुरूवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारी जवळील राहणाऱ्या किराणा दुकानदाराची हत्या केली. रवींद्र साहेबराव माळी (वय-३७) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अकरा जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे प्रकार?
शिर्डीच्या शासकीय गेस्ट हाऊस समोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीमध्ये रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याची तक्रार शिर्डी पोलीस स्थानकात रवींद्र साहेबराव माळी यांनी केली होती. याचा राग धरून अकरा जणांनी १९ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजेदरम्यान देशमुख चारीजवळ रवींद्र माळी यांच्यावर मानेवर चाकूने वार केले. तसेच त्यांना जबर जखमी करून त्यांचा खून केला.