शिर्डी (अहमदनगर) -शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. तरी सलून, कॅन्टीन, पार्लर, पान मसाल्याची दुकाने बंद राहतील, असे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी स्पष्ट केले. तर गुरुवार आणि रविवार बंद ठेवण्यात येणारे व्यवसाय आता आठवडाभर 9 ते 5 या वेळेत सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे.
लॉकडाऊन काळात शिर्डी व्यावसायिक अडचणीत आले आहेत. म्हणून त्यांना शासनाने करांमध्ये सूट द्यावी, या मागणीचा ठराव माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. व्यावसायिकांच्या भावना लक्षात घेऊन नगरपंचायतीने शासनाकडे ठराव पाठवावा, याबाबत मुख्यमंत्र्याकडे शिष्टमंडळ नेवून पाठपुरावा करणार आहेत, अशी ग्वाही विखे-पाटील यांनी दिली आहे.
मागील तीन महिन्यांपासून शिर्डीतील हॉटेल बंद आहेत. साई मंदीर कधी उघडणार? याबाबत सरकारकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. शहरातील सर्वच व्यवसाय साई मंदिराशी निगडीत आहेत. यामुळे व्यावसायिक अडचणीत आले असल्याची बाब ग्रामस्थांनी-विखे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच व्यावसायिकांना नगरपंचायतीने करांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी यावेळी विखे-पाटील यांच्याकडे केली.