अहमदनगर - नगर शहरातील माळीवाडा स्टॅण्ड जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी छत्रपती शिवरायांचे स्मारक एका नव्या आकर्षक नेत्रदीपक रुपात पहावयास मिळाले. (Shivteerth Lokarpan Ceremony) रुपडे पालटलेल्या या सुंदर स्मारकाचे अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवप्रेमींनी केली मोठी गर्दी-
सायंकाळी पाच वाजेपासून या भव्यदिव्य सोहळ्यास प्रारंभ झाला. विविध शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित येत 'अखंड हिंदू समाज, नगर' यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे शिवप्रेमी तरुणाईचे लोंढे सर्व रस्त्यांवरून दिसून येत होते. (MLA Sangram Jagtap) प्रत्येकाची पाऊले ही छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे पडत होती तर डोळे महाराजांची नव्या रुपातले स्मराक पाहण्यासाठी उत्सुकतेने आसुसलेली होती. संग्राम यांच्या हस्ते औपचारिक अनावरण, पारंपरिक पद्धतीने यावेळी अभिषेक आदी कार्यक्रम झाल्यानंतर आकर्षक डिजिटल रंगसंगतीची उधळण करत डीजेवर छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडे, गाणी आणि संगीत वाजायला लागल्या नंतर शिवप्रेमींनी ठेका धरला.
1955 साली झाली होती पुतळ्याची उभारणी-
नगरच्या माळीवाडा एसटी स्टॅण्ड समोर असलेल्या चौकात 1955 साली पंचधातुची छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. दरवर्षी शिवजयंती निमित्ताने मूर्तीला ऑईलपेंट दिला जात होता. स्मारकावरील ऑईलपेंट अनेकवर्षे साचल्याने त्याचे थरवाढत जाऊन त्याच्या खपल्या पडायला लागल्या होत्या.
संग्राम जगताप यांचा पुढाकार-
ही बाब शिवप्रेमींनी महानगरपालिका आयुक्तांना लक्षात आणून देत याच मूर्तीला नव्याने व्यवस्थित रूप देण्यासाठी विनंती केली होती, प्राप्त माहिती नुसार ही परवानगी नाकारली गेली. मात्र, शिवप्रेमींनी नाउमेद न होता शहराच्या लोकप्रतिनिधीं संग्राम जगताप यांना यात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला यश येत पुढील कार्यवाही सुरळीत पार पडून महानगरपालिका आयुक्तांनी परवानगी, निधीची व्यवस्था मंजूर केली होती.