अहमदनगर- शहरात रविवारी (दि. 7 फेब्रुवारी) शिवतीर्थ येथे नावीन्य रूप देण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डीजेच्या माध्यमातून विविध सीनेगीत लावण्यात आली होती. यावर महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष असलेले शिवसेना व काँग्रेस पक्षाकडून टीका करण्यात येत आहे.
मूळ कारण श्रेयवाद, डीजेही कारणीभूत -एकंदरीतच रविवारी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या गर्दीत संपन्न झालेल्या या सोहळ्याची जबाबदारी, श्रेयवाद याबद्दल आता चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. 'अखंड हिंदू समाज, नगर' या नावाखाली माळीवाडा बस स्टॅण्ड समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नावीन्य रूप देण्यात आले. या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा रविवारी संध्याकाळी दिमाखात पार पडला. कार्यक्रमात मुख्य लोकार्पण राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झालेले असताना राष्ट्रीय दुखवटा असतानाही डीजेवर गाणीच्या वाजविण्यात आले. यावर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना व काँग्रेस पक्ष यांच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कडक व स्पष्ट शब्दात निशाणा साधला.
शिवसेना-काँग्रेसने 'राष्ट्रवादी'ला घेरले -यावर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तर थेट पत्रकार परिषद आयोजित करत रविवारी ज्या पद्धतीने डीजेवर गाणे लावले गेले, त्यावर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका जाती-धर्माचे नसून सर्व समाजाचे आहेत, असे असताना या कार्यक्रमाला एक पक्षीय स्वरूप का देण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच युवा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी राष्ट्रीय दुखवटा असताना आमदार अशा गाण्यांवर नाचतातच कसे, असे म्हणत टीका केली. मात्र, या कार्यक्रमातून शिवसेना महापौरांना दूर ठेवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात केवळ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जंगताप व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच होते. ही जिल्ह्यातील शिवप्रेमींची फसवणूक असल्याचा घणाघात विक्रम राठोड यांनी केला.