अहमदनगर - महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांवर बूट फेकल्याप्रकरणी माजी मंत्री अनिल राठोड गुरुवारी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले. न्यायालयाने अनिल राठेड यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावर राठोड यांच्या वतीने जामीनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र जामीन देण्याचा अधिकार सत्र न्यायालयाला असल्याची बाजू सरकारी वकिलांनी मांडल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.
'बूट फेक'प्रकरणी शिवसेनेचे अनिल राठोड यांना न्यायालयीन कोठडी; जामीन अर्ज फेटाळला - शिवसेना
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक मदन आढाव यांनी आयुक्तांसमोरच शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकावला होता. त्याप्रकरणी राठोड स्वत: पोलिसात हजर झाले.
काही दिवसापूर्वी बोल्हेगाव रस्त्याचे काम रखडलेले असल्याने शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन महानगरपालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक मदन आढाव यांनी आयुक्तांसमोरच शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकावला होता. याप्रकरणी सोनटक्के यांच्या तक्रारीवरून शिवसेना कार्यकर्ते, नगरसेवक, यांच्यासह अनिल राठोड यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा, अधिकाऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अनेक आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली. परंतू विविध कार्यक्रमात हजर असलेले अनिल राठोड मात्र पोलिसांना सापडत नव्हते. अखेर राठोड हे स्वतःहून पोलिसात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले.
न्यायालयामध्ये राठोड यांच्या वतीने अॅड. विश्वासराव ताठरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राठोड यांच्या वतीने जामीनासाठी अर्ज करण्यात आला. या जामीन अर्जाला सरकारी वकील पी. ए. कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू असल्याचे सांगत जामीन देण्याचा अधिकार या न्यायालयाला नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राठोड यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अनिल राठोड यांच्या जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडे धाव घ्यावी लागणार आहे. तोपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे.