शिर्डी : Shirdi Triple Murder Case : कौटुंबिक वादातून जावयानं मेव्हणा, पत्नी आणि आजी सासूचा निर्घृण खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर इथं बुधवारी रात्री घडली आहे. सुरेश निकम असं मारेकरी (Shirdi Crime News) जावयाचं नाव आहे. तर वर्षा सुरेश निकम (मारेकऱ्याची पत्नी), मेव्हणा रोहीत चांगदेव गायकवाड यांच्यासह आजी सासू यांचा मृत्यू (Shirdi Triple Murder) झालाय. जावयानं केलेल्या हल्ल्यात (Son In Law Attack) सासरे चांगदेव गायकवाड यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीये.
जावयानं रात्री घडवलं हत्याकांड : चांगदेव गायकवाड यांचा परिवार सावळीविहीर गावातील विलासनगर परिसरात राहतो. बुधवारी रात्री उशीरा त्यांचा जावाई सुरेश निकम हा घरी आला. घरी आल्यानंतर त्यानं पुढं आलेल्या आजी सासूवर चाकूनं सपासप वार केले. त्यामुळं त्याची पत्नी आणि मेव्हणा त्याला सोडवण्यासाठी पुढं आले. मात्र, यावेळी सुरेश निकमनं त्यांच्यावरही सपासप वार केले. त्यानंतर घरातील त्याची मेव्हणी, सासू आणि सासरे चांगदेव गायकवाड यांच्यावरही सुरेश निकमनं चाकूनं वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले. चाकूहल्ला केल्यानंतर मारेकरी सुरेश निकम त्याचा चुलत भाऊ रोशनसह घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहिती या घटनेतील जखमी योगिता जाधव यांनी दिली.
कौटुंबिक छळामुळं पत्नी राहत होती माहेरी : मारेकरी सुरेश निकम याचा त्याची पत्नी वर्षासोबत वाद सुरु होता. सुरेश निकमचं कुटुंब छळ करत असल्याची तक्रार करत वर्षा माहेरी राहत असल्याचा दावा तिची बहीण योगिता जाधवनं केला आहे. पत्नी माहेरी राहत असल्यानं सुरेश निकम तिला घेण्यासाठी गेला होता, मात्र, वर्षाला पाठवण्यात आलं नव्हतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातूनच त्यांचा कुटुंबासोबत वाद सुरू होता.