अहमदनगर - शिर्डी साई संस्थानच्या साईबाबा आणि साईनाथ या दोन्ही रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका आणि परिचारक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज(गुरुवार) एक दिवसीय लाक्षणीक काम बंद आंदोलन केले आहे. साई संस्थानने कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान 45 हजार रुपये वेतनश्रेणी तसेच समान काम समान वेतन मिळावे यासाठी सुमारे 190 कामगारांनी साईबाबा रुग्णालयसह साई मंदिर प्रवेशद्वार क्रमांक चारसमोर हे आंदोलन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानचे दोन्ही रुग्णालय साईबाबांच्या रुग्णसेवेचा वारसा जपण्याचे कार्य आजतागायत करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदीर गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. मात्र, संस्थानची दोन्ही रुग्णालयात चोवीस तास सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाग्रस्तांसाठी संस्थानने कोविड सेंटर सुरू केले आहे. कोरोनाच्या काळात या दोन्ही रुग्णालयात खरे कोविड योद्धा म्हणून कंत्राटी तसेच संस्थान कंत्राटी असे 190 परिचारिका व परिचारक कामगार काम करत आहेत. मात्र, या कामगारांना संस्थानकडून देण्यात आलेल्या पगारातून चाळीस टक्के वेतन कपात करण्यात आली आहे. तसेच कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच पगारापेक्षा यांचे वेतन तटपुंजी आहे. कोविड सेंटरमध्ये हे कामगार आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. दरम्यान आम्हाला कायम कामगारांप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे, तसेच कुटुंबाला विमा संरक्षण, महिन्यातील चार सुट्ट्या पगारी मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी आज आंदोलन केले असल्याचे परिचारिका आणि परिचारक यांनी सांगितले आहे.