अहमदनगर- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांनाही राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. 1 जानेवारी 2016 पासून त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय साई संस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू - अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे
शिर्डीच्या साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे.
याबाबत फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना रोखीने देण्यात येणार आहे. चालू महिन्यापासून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती, संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे फरकाच्या रक्कमेपोटी 37 कोटी तर पुढील वर्षासाठी 20 कोटी, असा 57 कोटी रुपयाचा अर्थिक भार संस्थानवर पडणार आहे. याचा लाभ 1950 कर्मचाऱ्यांना होणार आहे. याबरोबरच अनुकंपा तत्वावर संस्थान सेवेत सामावुन घेण्याबाबत अनेक वेळा मागणी करत असलेल्या 63 कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच नर्सिंग कत्रांटी कर्मचाऱ्यांना 40 टक्के पगार वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही हावरे यांनी सांगितले.