महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी ते मुंबई : संस्थान कर्मचाऱ्याचा लेक टीव्ही स्क्रीनवर, पदार्पणातच प्रेक्षकांवर अधिराज्य!

अभिनयाचा पिढीजात पार्श्वभूमी नसताना केवळ अंगभूत कलेच्या जोरावर गणेश निवृत्ती जाधव युवा अभिनेत्याने दहेगाव-कोऱ्हाळे ते मुंबई असा पल्ला यशस्वीपणे गाठला आहे. मराठी दूरचित्रवाहिनीवरील आघाडीच्या ‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील गणेशचा अभिनय प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे.

ganesh jadhav
गणेश जाधव

By

Published : Feb 8, 2022, 8:05 PM IST

शिर्डी - शेतीमातीशी नाळ जपणारा अस्सल मातीतला कसदार कलाकार रुपेरी पडद्यावर झळकत आहे. हयातभर कष्ट झेलणाऱ्या आईवडिलांना रुपेरी पडद्यावरील लेकाचा वावर मोहून टाकत आहे. अभिनयाचा पिढीजात पार्श्वभूमी नसताना केवळ अंगभूत कलेच्या जोरावर गणेश निवृत्ती जाधव युवा अभिनेत्याने दहेगाव-कोऱ्हाळे ते मुंबई असा पल्ला यशस्वीपणे गाठला आहे. मराठी दूरचित्रवाहिनीवरील आघाडीच्या ‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील गणेशचा अभिनय प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. गणेशची स्वयंभू भूमिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

गणेशच्या अभियनातील नैसर्गिक सहसजतेमुळं मराठीतील दिग्दर्शकांच्या गुडबुकमध्ये गणेश जाऊन पोहोचला आहे. एकेकाळी ऑडिशनसाठी रांगेत ‘वेटिंग’ करणारा गणेश दिग्दर्शकांच्या ऑफर लिस्टमध्ये आहे. गणेशचे वडील साईसंस्थानच्या स्वच्छता विभागात कार्यरत आहेत. संस्थान कर्मचाऱ्याच्या लेकाची रुपेरी पडद्यावरील भरारी नवं बळ देणारी ठरत आहे.

  • रक्तात अभिनयाचं बाळकडू -

शिर्डीनजीक असलेलं दहेगाव-कोऱ्हाळे हे गणेशचं मूळ गाव. आई-वडील दोघेही शेतकरी. संसाराचा गाडा हाकण्यासाठी वडिलांनी साई संस्थानच्या स्वच्छता विभागात नोकरीची वाट धरली. मात्र, घराला हातभार लावण्यासाठी शालेय वयापासून गणेशला शेतात जावे लागले. जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसायही त्याने केला. शेतीत-मातीत रमत असताना कलेची नाळ तूटू दिली नाही. शिर्डी-राहाता परिसरात गणेशउत्सव, सार्वजनिक सोहळ्यात गणेशने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयाची स्नेहसंमेलनं गणेशनं गाजवली.

  • कलापंढरीवर अधिराज्य -

कलेला श्वास मानणाऱ्या गणेशनं अभिनयातील शिक्षणासाठी पुणे विद्यापीठ गाठलं. विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात गणेशनं अभ्यासाच्या जोरावर प्रवेश मिळवला. जागतिक किर्तीचे कलाकार घडविणाऱ्या कलापंढरीत गणेशवर अभिनयाचे पैलू पाडले गेले. अंगभूत कलेची देणगी अन् नाट्यशास्त्राच्या प्रशिक्षणामुळं गणेशची कलासक्त अभिनेता बनला. कलेच्या नैपुण्याच्या बळावर दहेगाव-कोऱ्हाळेच्या गणेशनं सांस्कृतिक राजधानीत आपला ठसा निर्माण करण्यास सुरूवात केली.

  • रिजेक्ट, रिजेक्ट अन् रिजेक्ट -

संघर्ष व जिद्दीच्या जोरावर गणेशला अभिनयाचं अवकाशं खुलं होत गेलं. ख्यातनाम अभिनेते अतुल कुलकर्णी मुख्य प्रवर्तक असलेल्या ‘क्वेस्ट’ संस्थेची पाठ्यवृत्ती गणेशला घोषित करण्यात आली. राज्यभर नाटकाचे प्रयोग करण्याची संधी गणेशला मिळाली. ‘किनारा तुला पामराला...’ म्हणतं जिद्दीचं गर्वगीत गाणाऱ्या गणेशला पुढची संधी खुणावत होती. पावला पावलावर गणेशला संघर्षाला सामोरं जावं लागलं. लाईट, कॅमेरा अन् अक्शनच्या जगात गणेश ऑडिशनला सामोरे जात होता. शिर्डी-पुणे-मुंबई असा प्रवास सातत्याने सुरू होता. ‘रिजेक्शन’चा ब्रेक लागला तरी गणेश जिद्दीनं अडथळा पार करतं प्रवास सुरुच ठेवला.

  • वेटिंग लिस्ट ते गूडबुक -

गणेशच्या संघर्षाला स्वप्नपूर्तीचं फळ लगडलं. झी-मराठीच्या ऑडिशनचा गड गणेशनं यशस्वीपणे सर केला. अभिनयाचा पिढीजात वारसा नसणाऱ्या गणेशची झी-मराठीच्या पडद्यावर एंट्री झाली. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!’ मालिकेतून गणेशला ब्रेक मिळाला. गणेशची स्वयंभू भूमिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. गणेशच्या अभियनातील नैसर्गिक सहसजतेमुळं मराठीतील दिग्दर्शकांच्या गुडबुकमध्ये गणेश जाऊन पोहोचला. एकेकाळी ऑडिशनसाठी रांगेत वेटिंग करणारा गणेश दिग्दर्शकांच्या ऑफर लिस्टमध्ये जाऊन पोहोचला.

  • वेबसीरिजचा चेहरा -

झी-मराठीवरील सुपरहिट ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेची दार गणेशसाठी खुली झाली. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत गणेश आव्हानात्मक भूमिका साकारतो आहे. सहजसुलभ अभिनयामुळे गणेशने आपली छाप कायम ठेवली आहे. सध्या सिंधूदुर्गात मालिकांच्या शूटिंगमध्ये गणेश व्यस्त आहे. आगामी काळात वेबसीरिजच्या ऑफर गणेशसाठी येऊन धडकल्या आहेत. अंगभूत गुणसंपन्नतेच्या जोरावर रुपेरी पडदा गाजविणाऱ्या गणेशच्या कामगिरीने कुटूंबीय भारावून गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details