शिर्डी (अहमदनगर)- राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने 28 मार्चच्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी 7.15 ते रात्री 7.45 यावेळेत खुले राहणार असून साई प्रसादालय हे सकाळी 10 ते रात्री 7.30 यावेळेत सुरू राहणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली आहे.
कोरोनामुळे शिर्डी साईबाबांच्या समाधी मंदिराच्या वेळेत बदल - शिर्डी साई कोरोना नियम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी 7.15 ते रात्री 7.45 यावेळेत खुले राहणार असून साई प्रसादालय हे सकाळी 10 ते रात्री 7.30 यावेळेत सुरू राहणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली आहे.
दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबरपासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने साईबाबा मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी साईबाबा समाधी मंदिर सकाळी 7.15 ते रात्री 7.45 यावेळेत खुले राहणार असून रात्री 10.30 यावेळेत होणारी साईबाबांची शेजारती व पहाटे 4.30 वाजताची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल. परंतु, याकरीता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच साई प्रसादालय हे सकाळी 10 ते रात्री 7.30 यावेळेत भाविकांकरिता सुरू असणार आहे. तरी सर्व साईभक्तांनी या होणाऱ्या बदलाची नोंद घ्यावी आणि कोविड-19 संदर्भातील नियमांचे पालन करून साईबाबा संस्थानला सहकार्य करण्याचे आहवान साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले आहे.