शिर्डी (अहमदनगर) - 'श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची असून आपले स्वास्थ्य असेल तर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आपणास पुन्हा पुन्हा येता येईल. त्यामुळे 'सर सलामत तो पगडी पचास' असे म्हणत भाविकांनी दर्शनासाठी येताना दर्शनाची वेळ, मार्गदर्शक सूचना नीट ध्यानात घ्याव्यात. शनिवारी, रविवारी शिर्डीत अनावश्यक गर्दी टाळावी,' असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले आहे.
साई मंदिरात येताना दर्शनाची वेळ, मार्गदर्शक सूचना ध्यानात घ्याव्यात - मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डीत मोजक्याच भाविकांना साई दर्शन दिले जात आहे, कोविडचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहेत. ते काटेकोर पाळले गेले नाहीत तर शिर्डीत गर्दी होईल आणि गर्दीमुळे संपूर्ण देशातून येणार्या भाविकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल. त्यानुषंगाने भाविकांनी गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बगाटे यांनी यावेळी केले आहे.
हेही वाचा -'विठ्ठला'च्या दारी पुन्हा संचारबंदी; कार्तिकी वारी निमित्ताने घेतला निर्णय
गुरुवार, रविवारी जास्त गर्दी होऊ नये म्हणून वेबसाईटवर वेळ निश्चित करूनच यावे
'अनलॉकनंतर शिर्डीचे साईबाबा मंदिर उघडण्यात आले आहे. भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी प्रमाणित कार्यपद्धती प्रमाणे दिवसाला सहा हजार भाविकांचे दर्शनासाठी नियोजन केले होते. त्यानंतर भाविकांचे सहकार्य चांगले मिळाल्याने आणि दर्शन रांगेत संस्थानच्या वतीने मार्गक्रमणाची दिशा निश्चित केल्यामुळे बाबांच्या समाधीजवळ तसेच मुखदर्शनासाठी भाविकांना जास्त संतुष्टी मिळत आहे. साई मंदिरात गेल्यानंतर साईबाबांचे दर्शन कमीत कमी पाच मिनिटे उभे राहून मन भरून बाबांकडे बघता येते. त्यामुळे त्या दर्शन रांगेत जो सहा हजार भाविकांचा आकडा होता, त्यात वाढ होऊन आठ हजारांच्या जवळपास नेता येणे शक्य झाले आहे. त्यासाठी संस्थान प्रशासनाने सॅनिटायझिंगसाठी ठेवण्यात आलेली थांबवण्यात आलेली मधली वेळ जास्त माणसे वापरून कमी करण्यात आली. गुरुवार, रविवारी जास्त भाविकांची गर्दी होण्याचा शिर्डीचा पूर्व इतिहास आहे. या दोन दिवशी शिर्डीत येण्याची भाविकांची श्रद्धा जरी योग्य असली तरी तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन आरती, दर्शनाची वेळ, तारीख निश्चित करूनच शिर्डीला यावे,' अशी विनंती बगाटे यांनी केली आहे.
साईबाबा संस्थानच्या वतीने चांगली व्यवस्था - भाविक राज्य शासनाच्या निर्णयानंतर करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीचे साई मंदिर खुले करण्यात आले. साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर परिसरात दर्शनरांगेत अत्यंत सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे भाविकांनी सांगितले आहे. अशीच व्यवस्था पुढे चालू ठेवली तर, साईंचे मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य प्रत्येकाला लाभेल, असे मत परराज्यातील आणि राज्यातील भाविकांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -'किल्ले रायगडवर दुसरा रोप वे उभारणार'