अहमदनगर- शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भक्त येत असतात. याचाच फायदा घेत देशभरातील चोरांचेही शिर्डीत आश्रय स्थान बनले आहे. अशात साईच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना प्रसादात गुंगीचे औषध टाकून तो भक्तांना खाऊ घालत त्यांना लुटणाऱया महिलेला शिर्डीत अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे
साईबाबांच्या दुपारच्या आरतीवेळी भाविकांना मंदिर परिसरात संस्थानाच्यावतीने प्रसाद वितरीत करण्यात येतो. हाच प्रसाद घेत त्यात गूंगीचे औषध टाकून झारखंडमधून चोरीच्या उद्देशाने शिर्डीत आलेल्या पिंकी नावाच्या महीलेने शिर्डीतीतच राहणारी वृद्ध महिला छबुबाई गरडची लुट केल्याचे समोर आले.
गुरुस्थान मंदिरा जवळ छबूबाई गेल्या असताना एका महिलेने त्यांना प्रसाद खायला दिला. त्यानंतर थोड्याच वेळात छबुबाई गूंगी येऊन पडल्या. काही वेळाने शुद्धीवर येताच आपल्या गळ्यातील सोन्याची पोत आणि पैसे गायब झाल्याचे छबुबाईंच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने संस्थानच्या सुरक्षा रक्षकांना याची माहीती दिली. या माहितीच्या आधारे संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी 19 जून रोजीचे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, एक महिला या वयोवृद्ध आजीच्या गळ्यातील पोत घेऊन जात असल्याचे उघड झाले. या महिलेला पकडण्यासाठी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी तपास सुरू केला असता, ती महीला मंदिर परीसरातच आढळून आली. यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
शिर्डीत प्रसादात गुंगीचे औषध टाकून लुटायची महिला
अटक केलेल्या महिलेनी मुलांच्या शिक्षणासाठी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर तिने आतापर्यंत किती वेळा चोरी केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची फसवणूक तसेच पाकीट मारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता बाबांचा प्रसाद खावू घालून लुटण्याची घटना उघडकीस आल्याने भक्तांनी सावधगीरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.