दानात रोख रक्कम, सोने-चांदीसह ऑनलाईन देणगीचा समावेश शिर्डी (अहमदनगर)-साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीनं नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 'शिर्डी महोत्सव' आयोजित केला होता. हा महोत्सव २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक १ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी मिळाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
संस्थानचे प्रमुख मुख्य कार्यकारी हुलवळे म्हणाले, शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत दानपेटीतून ७ कोटी ८० लाख ४४ हजार२६५ रुपये मिळाल आहेत. देणगी काउंटरव्दारे ३ कोटी ५३ लाख ८८ हजार ४७६ रुपये देणगी मिळाली आहे. अनेक भाविक डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डिडी व मनी ऑडरव्दारेही शिर्डी संस्थानला देणगी देतात. यामधून साईभक्तांकडून ४ कोटी २१ लाख ४० हजार ८९३ रुपयांची देणगी साई संस्थानला मिळाली आहे.
कोट्यावधींचे रोख रकमेचे दान सोने-चांदीचेही शिर्डीत भरभरून दान-शिर्डी देवस्थानला साईभक्तांकडून एकूण १५ कोटी ५५ लाख ७३ हजार ६३४ रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त मिळालेली आहे. सोने ५८६.३७० ग्रॅम (३२,४५,२९५ रुपये) दान करण्यात आले आहे. चांदी १३ किलो ४१६ ग्रॅम (७,६७,३४६ रुपये) साईचरणी अर्पण करण्यात आली आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातून एकूण १५ कोटी ९५ लाख ८६ हजार २७५ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.
साईबाबा संस्थानच्या वतीनं प्राप्त झालेल्या दानाचा वापर हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजनासाठी करण्यात येतो. तसंच संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधाकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येतो- मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे
६ लाखांहून अधिक जणांनी घेतला मोफत प्रसाद-महोत्सवादरम्यान ६ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईप्रसादालयात मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख २५ हजाराहून अधिक साईभक्तांनी अन्न पाकिटातून प्रसाद घेतला आहे. साईसंस्थाननं ११,१०,६०० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली आहे. यातून शिर्डी संस्थानला १ कोटी ४१ लाख ५५ हजार ५०० रुपये दान प्राप्त झालेले आहेत. याबरोबरच साईभक्तांनी ७,४६,४०० मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.
लाखो साईभक्तांनी नववर्षानिमत्त घेतलं दर्शन-नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी, यासाठी लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले. शिर्डीत संस्थानच्या वतीनं रात्रभर साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. शिर्डीत दरवर्षीप्रमाणं नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता देश-विदेशातून साईभक्तांनी गर्दी केली होती. साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
हेही वाचा-
- शिर्डीत नवीन वर्षाची साईबाबांची दैनंदिनी घेण्यास भाविकांची गर्दी
- 'राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर कर'; शरद पवार यांची साई चरणी प्रार्थना
- नववर्षाच्या स्वागतासाठी साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, पाहा व्हिडिओ