शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीष दिघे शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक 4 समोरील नगरपंचायतच्या जागेत शिर्डी नगरपंचायतीने तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून गार्डन बनवले आहे. त्या गार्डनमध्ये साईबाबांचे देखावेही उभारले आहेत. येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या काळात हे गार्डन भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीष दिघे यांनी दिली.
गार्डनमध्ये साईबाबांची मूर्ती उभारण्यात आली : देश विदेशातून दरवर्षी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. यावेळी दर्शनाच्या या आठवणी भाविकांसोबत कायम सोबत राहाव्यात यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक 4 समोर असलेल्या शिर्डी नगरपंचायतीच्या त्रिकोणातील 20 गुंठे मोकळ्या जागेत गार्डन आणि भव्य अशी कोरीव साईबाबांची मूर्ती उभारण्यात आली आहे. साईबाबांच्या या मूर्तीसमोर भाविकांना सेल्फी घेता येणार आहे. या गार्डनमुळे भाविकांच्या मनात साईबाबांच्या दर्शनच्या आठवणी कायम राहतील, अशी माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी दिघे यांनी दिली आहे.
साईबाबांच्या रथाची मिरवणूक गार्डन जवळून जाते : साईबाबांच्या मंदिरात साजऱ्या करण्यात येणाऱ्या प्रत्येक उत्सवाच्यावेळी साईबाबांच्या रथाची मिरवणूक शिर्डी नगरपंचायतीच्या गार्डन जवळून जाते. त्याच बरोबर साईबाबांची दर गुरुवारी निघणारी पालखीही या मार्गवरून जाते. त्यामुळे या गार्डनला श्री साई पालखी गार्डन असे नाव देण्यात आले आहे. साईबाबा वृक्षांना पाणी देताना, दिवे लावताना तसेच साईबाबांची पालखी, असे भव्य दिव्य देखावे या गार्डनमध्ये आहेत.
एक ते दीड महिन्यात गार्डन खुले होणार : या सोबतच 21 फुट उंच अशी साईबाबांची मूर्ती देखील या गार्डन मध्ये बसवण्यात आली असल्याचे शिर्डी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सतीष दिघे म्हणाले. सध्या या गार्डनचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या एक ते दीड महिन्यात हे श्री साई पालखी गार्डन भाविकांसाठी खुलं होणार असल्याचे दिघे म्हणाले.
हेही वाचा :
- Rashtrapati Bhavan : शिर्डीतील दोन आचाऱ्यांना थेट राष्ट्रपती भवनातून जेवण बनवण्यासाठी आमंत्रण
- Shirdi Sai Sansthan Defamation Message: म्हणे, साई संस्थानने हजला देणगी दिली अन् राममंदिराला नाकारली; ही तर बदनामीच
- Shirdi Airport: साईभक्तांसाठी खुशखबर; शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंगची सुविधा