शिर्डीत संचारबंदी दरम्यान चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला.. किराणा सामानासह हँडवॉशची चोरी - hand wash chori
शिर्डीत किराणा मालाच्या दुकानात चोरी झाली आहे. चोरांनी किराणा माल, रोख रकमेसह हँड वॉशवरही हात मारला आहे. चोरी करतांना हँड वॉशही नेल्याने कोरोनाच्या संसर्गात चोरटेही स्वच्छतेचीही काळजी घेत असल्याचेही समोर आले आहे.
शिर्डी (अहमदनगर ) -कोरोनाच्या जगव्यापी संकटात आता गावोगावी किराणा मालाच्या चोरीच्या घटनाही समोर येत आहेत. आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास शिर्डीतील एक दुकान फोडून चोरट्यांनी किराणा मालासह हॅंड वॉशवरही हात मारला.
नगर-मनमाड मार्गालगत जोशी हॉस्पिटलच्या समोर अशोक जगन्नाथ अहिरे यांचे श्रम साफल्य नावाचे किराणा मालाचे होलसेल दुकान आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी शटर तोडून या दुकानात चोरी करून जवळपास पाऊण लाखांचा माल लांबवला. यात प्रत्येकी पंधरा किलो वजनाचे सोळा तेल डबे, २० किलो तूप, काजू, बदाम, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटस, बिस्कीट व जवळपास पंचवीस हॅंड वॉशचाही समावेश आहे. याशिवाय दुकानाच्या गल्ल्यातील दहा ते पंधरा हजाराची रोकडही चोरीस गेली आहे. चोरट्यांनी हा माल नेण्यासाठी मोठ्या गाडीचा वापर केला असण्याची शक्यता आहे....