शिर्डी (अहमदनगर) Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे दुसऱ्यांदा उपोषण सुरू केलंय. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. (Maratha reservation issue) शिर्डीतही गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात येतंय. हे आंदोलन अजून तीव्र करण्यासाठी शिर्डीतील मराठा समाजाच्या वतीनं सोमवारी शिर्डी शहर बंद ठेवण्याची हाक दिलीय. साईबाबा मंदिर आणि साई संस्थानचे प्रसादालय व संस्थानच्या सर्व सुविधा भाविकांसाठी खुल्या राहणार आहेत. (Shirdi citizens support Jarange Patil)
शिर्डी नगरपरिषदजवळ साखळी उपोषण : मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देत शिर्डीतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी नगरपरिषदजवळ साखळी उपोषण सुरू केलंय. या साखळी उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस होता. सायंकाळी शिर्डीतील साई निर्माण शैक्षणिक संकुलाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'ईडब्ल्यूएस सर्टीफिकेट'सह शैक्षणिक कागदपत्रे जाळत यावेळी निषेध व्यक्त केलाय. त्याचबरोबर उपोषणस्थळापासून विद्यार्थ्यांनी तसेच उपोषणकर्त्यांनी शिर्डी शहरातून कँडल मार्च काढलाय. कँडल मार्च उपोषण स्थळाजवळ आल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी शिर्डी शहर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार असल्याचे यावेळी मराठा आंदोलक विजय जगताप यांनी सांगितलं.