शिर्डी : शिर्डी शहराचा कायापालट करणाऱ्या सौंदर्यकरणाच्या पहिल्या टप्प्यातील 52 कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. 'विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी' अशी शिर्डीची प्रतिमा होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
आराखड्याचे सादरीकरण केले : राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेत शिर्डी सौंदर्यकरणाच्या आराखड्याची प्रत साईचरणी अर्पण केली. शिर्डी संस्थान सभागृहात वास्तूविशारद तज्ज्ञ अजय कुलकर्णी यांनी या सौंदर्यकरण आराखड्याचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता तालुक्याचे तहसीलदार अमोर मोरे तसेच शिर्डीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिर्डीसाठी 52 कोटींचा विशेष निधी मंजूर : शिर्डी शहर, मंदिर परिसर आणि परिक्रमा मार्गाचे सुशोभीकरण करून ठिकठिकाणी सौंदर्यस्थळे विकसित व्हावीत यासाठी राज्यशासनाकडून शिर्डीसाठी 52 कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मंदिरासमोरील पादचारी मार्ग, शहरातील मुख्य प्रवेश मार्ग, मुख्य चौक, मंदिर आवारातील पादचारी मार्ग आणि शिर्डी परिक्रमेच्या 14 किलोमीटर मार्गाच्या सौंदर्यीकरणाचे सुनियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील कामांना तीन महिन्यात सुरूवात होईल. सुशोभीकरण करताना ग्रामस्थांच्या सूचनांचाही गांभीर्याने विचार करण्यात येईल.