अहमदनगर :आज पासून आदिशक्ती आदिमायेचा जागर नवरात्र उत्सवाच्या (Sharadiya Navratri festival Ahmednagar) निमित्ताने होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत समजल्या जाणाऱ्या मोहटादेवी गडावर आदिशक्ती रेणुकामाता मोहटा देवीचा नवरात्र उत्सवास सुरुवात (Navratri festival at Mohtadevi Fort) झाली आहे. घटस्थापणेपूर्वी आई मोहटादेवीचा मुखवटा मोहटा गावातून वाजत-गाजत गडावर आणण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुनील श्रीधर गोसावी यांनी सपत्नीक नीता सुनील गोसावी यांच्या हस्ते देवीची घटस्थापना विधीवत पूजा करून करण्यात आली. (Ahmednagar News)
देवस्थानाचा विकास आराखडा तयार -मोहटादेवी हे राज्यातील देवीभक्तांचे जागरूक स्थान म्हणून प्रसिद्ध असून राज्यभरातून भाविक लाखोंच्या संख्येने नवरात्रोत्सव निमित्ताने गडाला भेट देत असतात. भक्तांना जास्तीत-जास्त सुविधा मिळाव्यात आणि गड पंचक्रोशीत विकासकामांसाठी जवळपास अडीचशे कोटींचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे. येथे सरकार आणि दानशूर भक्तांच्या सहकार्याने परिसरात हॉस्पिटल, शैक्षणिक केंद्र, ध्यानधारणा केंद्र आदींचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आल्याचे मोहटादेवी देवस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी आणि विश्वस्त भीमराव पालवे, अशोक दहिफळे, आजीनाथ आव्हाड, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, कार्यकारी अधिकारी भणगे यांनी सांगितले आहे.