अहमदनगर- आपल्या भोवतालच्या देशांनी हुकूमशाही अनुभवली आहे. असे असताना जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागलले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे आयोजित सभेत बोलत होते.
शरद पवार सभेमध्ये बोलताना माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रचारसभेत प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जि. प उपाध्यक्ष राजश्री घुले, राष्ट्रवादीच्या शारदा लगड, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप काका ढाकणे उपस्थित होते.
गेल्या ५ वर्षांमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आणि आशेचे गाजर दाखवले. शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान करण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. या सरकारला मताच्या माध्यमातून उत्तर देण्याची वेळ आली आहे, पंतप्रधान मोदी सध्या व्यक्तीशः टीका करून जनतेची दिशाभूल करत आहेत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. नेहरू-गांधी परिवाराने देशासाठी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांना ७१ कोटींची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे स्वातंत्र्योत्तर काळातील पहिलेच सरकार म्हणून पुढे आले. सध्या देशामध्ये अस्थिर वातावरण ५ वर्षांच्या काळामध्ये तयार झालेले आहे. नको त्या विषयांवर मोदी सरकार वारंवार चर्चा करून सामान्य जनतेची दिशाभूल करत आहे. या सरकारने जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळण केली आहे. भाषणबाजी व जाहिरातबाजी यावर जनता पुढील काळात भुलणार नाही. देशाच्या पंतप्रधानांनी या ५ वर्षांत केलेल्या परदेशवारीवर कोट्यंवधीचा खर्च केला. परंतु, त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याचे पवार यांनी म्हणाले.
संपूर्ण विखे परिवार बालहट्ट पुरवण्यासाठी सज्ज - थोरातांचे विखेंवर पुन्हा टीकास्त्र
आपल्या भाषणात माजी मंत्री आणि विखेंचे राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा विखे परिवाराला धारेवर धरले. मोदींना घालवायचे आहेच पण त्यांच्यासोबत बालहट्ट करत असलेल्यांना पण परत पाठवायचे आहे. सध्या संपूर्ण परिवार हा बालहट्ट पुरवण्यासाठी प्रयत्न करत असला तरी त्यांचा हा हट्ट दक्षिणेतील मतदार पूर्ण करणार नाही. कारण, संग्राम जगताप सारखा उमेदवार जनतेसमोर आहे. तसेच यापूर्वीही त्यांनी एकदा दक्षिणेचे प्रतिनिधित्व करून पुन्हा उत्तरेत आले आहे, त्याचा अनुभव येथील जनतेला असल्याची टीका थोरात यांनी यावेळी केली.
यावेळी जिल्ह्यातून आलेल्या अनेक नेत्यांनी उत्तरेतील वादळ रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याच्या भावना व्यक्त केल्या. जनशक्ती मंचाचे शिवाजीराव काकडे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी जनशक्ती मंचच्या जिल्हा परिषद सदस्या काकडे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर कडाडून टीका केली. माजी जि.प अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष करण ससाणे, मा. आमदार चंद्रशेखर घुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष स्नेहलता फुंदे आदी उपस्थित होते.